राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी आज आयोजित केलेल्या अफगाणिस्थानशी संबंधित दिल्ली प्रादेशिक सुरक्षा चर्चासत्रासाठी आलेल्या सात देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेच्या प्रमुखांनी चर्चासत्रानंतर एकत्रितपणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
पंतप्रधानांशी बोलताना इराण, कझाकस्तान, किर्गिझस्तान, रशिया, ताजिकिस्तान, तुर्कमेनिस्तान आणि उजबेकिस्तान या राष्ट्रांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या वरिष्ठ सुरक्षा अधिकाऱ्यांनी अशा प्रकारचे चर्चासत्र आयोजित करण्यासाठी भारताने घेतलेल्या पुढाकाराची तसेच या बैठकीत झालेल्या विधायक चर्चेबाबत प्रशंसा केली. अफगाणिस्तानमधील परिस्थितीबाबत आपापल्या राष्ट्रांचा दृष्टिकोनही त्यांनी विशद केला.
महामारीने अनेक आव्हाने निर्माण केली असताना देखील वरिष्ठ स्तरावरील मान्यवरांनी दिल्ली येथे चर्चासत्रात घेतलेल्या सहभागाबद्दल पंतप्रधानांनी प्रशंसा केली.
या प्रदेशातील राष्ट्रांनी अफगाणिस्तानच्या संदर्भात सर्वसमावेशक शासन , अफगाणिस्तानच्या सीमांचा दहशतवाद्यांकडून वाढत्या वापराबाबत शून्य सहनशीलता धोरण, अमली पदार्थांच्या चोरट्या वाहतुकीला तसेच अफगाणिस्तान मार्फत होणाऱ्या शस्त्रास्त्रांच्या वाहतुकीला अटकाव, आणि अफगाणिस्तानमधील मानवी हक्काच्या परिस्थितीची दखल ही चार उद्दिष्टे लक्षात ठेवणे आवश्यक आहे असे ते म्हणाले,
प्रादेशिक सुरक्षा चर्चासत्रामुळे मध्य आशियातील संयमी आणि प्रगतीशील संस्कृतीचे पुनरुज्जीवन होईल आणि कट्टरवादी प्रवृत्तींना आळा बसेल अशी आशा पंतप्रधानांनी यावेळी व्यक्त केली.